भारतीय रेल्वेची मोठी कामगिरी, डिझेल-विजेशिवाय धावणार ट्रेन

कोरोना संकटाच्या काळात भारतीय रेल्वेने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. भारतीय रेल्वेने बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनची निर्मिती केली असून, याचे यशस्वी परीक्षण देखील केले आहे. म्हणजेच आता पुढील काही दिवसात रुळावर बॅटरीवर धावणाऱ्या रेल्वे पाहण्यास मिळणार आहेत. रेल्वेनुसार, या इंजिनची निर्मिती वीज आणि डिझेलचा वापर कमी करण्यासाठी केली आहे. पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर मंडलमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या या इंजिनला नवदूत असे नाव देण्यात आले आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करत माहिती दिली की, बॅटरीद्वारे ऑपरेट होणारा हा लोको एका उज्जवल भविष्याचे संकेत आहे. जे डिझेलसोबतच परकीय चलनाची बचत आणि पर्यावरण संरक्षणासाठी एक मोठे पाऊल आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच रेल्वेने सोलर पॉवरच्या वीजेद्वारे ट्रेनला वीज पुरवठा केले जाईल असे म्हटले होते. रेल्वेने याची तयारी देखील केली आहे. मध्य प्रदेशच्या बीना येथे रेल्वेने यासाठी सोलर पॉवर प्लांटची उभारणी केली आहे. यातून 1.7 मेगा वॉट वीज उत्पन्न होईल व थेट रेल्वेच्या ओव्हर हेडपर्यंत पोहचेल. रेल्वेचा दावा आहे की, असे करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.

Leave a Comment