पुण्यात कोरोनाचा वाढता प्रकोप; पुणे आणि लगतच्या परिसरात लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक


पुणे : पुणे शहर आणि लगतच्या परिसरात कोरोनाचा प्रकोप वेगाने वाढत आहे. त्यातच काल दिवसभरात पुणे शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 1147 नव्या रुग्णांची भर पडली, तर जिल्ह्यातील आकडेवारीत दिवसभरात एकूण 1618 नवीन रूग्णांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर पुण्याच्या ग्रामीण भागातही एकाच दिवसात 168 रूग्णांची वाढ झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 32596 वर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता पुणे शहरातील काही भागांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत.

दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरालगत असलेल्या हिंजवडी आणि मारुंजी परिसरात आजपासून 8 दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान केवळ दूध, मेडिकल आणि दवाखाने सुरू असतील. तसेच या भागातील आयटी कंपन्यांना मात्र सूट देण्यात आली आहे.

त्याचबरोबर हवेली तालुक्यातील नांदेड गाव, खडकवासला, किरकीटवाडी, नऱ्हे, मांजरी, पिसोळी, वाघोली, न्यू कोपरे, खानापूर, गुजर निंबाळकरवाडी, वडाची वाडी, लोणी काळभोर, भिलारे वाडी, उरुळी कांचन, शेवाळेवाडी, भिलारे वाडी कदमवाक वस्ती, कुंजीर वाडी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे शहरात कोरोनाचा प्रकोप झाला असून शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. त्यातच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यानंतर माजी महापौर आणि आमदार मुक्ता टिळक यांना देखील कोरोनाची लागण झाली. त्याचबरोबर कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांना होम क्वारंटाईन व्हावे लागले आहे. त्याच बरोबर इतरही काही पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना संसर्ग झाल्याने आता राजकीय वर्तुळात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे.

Leave a Comment