ट्रम्प यांचा मोठा निर्णय; जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली अमेरिका


वॉशिंग्टन : चीनच्या वुहानमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात सध्या दहशत व्याप्त आहे. त्याच दरम्यान अमेरिकेने कोरोनावरून चीनसोबत असलेल्या वादामुळे जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. पण आता अमेरिकेने औपचारिकता पूर्ण करत जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भातील माहिती अमेरिकेचे खासदार बॉब मेनंडेझ यांनी ट्विट करून दिली. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, चीनसोबत कोरोना साथीमुळे असलेल्या वादामुळे जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका अधिकृतपणे बाहेर पडल्याची माहिती कार्यालयाकडून काँग्रेसला मिळाली आहे.

मे महिन्यातच जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली होती. जागतिक आरोग्य संघटनेची चीनने कोरोनाबाबत दिशाभूल केली आहे. त्याचबरोबर ट्रम्प यांनी चीनकडून कायम गोष्टी लपवल्या जात असल्याचा वारंवार आरोप केला होता. कोरोनावर चीनला उत्तर द्यावेच लागेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले होते. चीनच्या नियंत्रणाखाली जागतिक आरोग्य संघटना असल्याचा आरोपही यावेळी ट्रम्प यांनी केला.

जागतिक आरोग्य संघटनेला केवळ 40 मिलियन चीन देते तर 450 मिलियन डॉलरची मदत अमेरिकेकडून केली जाते. चीनकडून कमी पैसे मिळत असूनही जागतिक आरोग्य संघटनेवर त्यांचे नियंत्रण असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

Leave a Comment