केंद्र सरकार करणार राजीव गांधी फाउंडेशनमधील नियमबाह्य देणग्यांचा तपास


नवी दिल्ली – परदेशातून देणग्या घेताना राजीव गांधी फाउंडेशनकडून कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप होत असून आता केंद्र सरकार या प्रकरणाचा तपास करणार आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने आंतर मंत्रालयीन समितीची स्थापना केली असून या समितीच्या प्रमुखपदी ईडीचे संचालक असणार आहेत. या संदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

परदेशातून विशेषतः चीनकडून देणग्या घेताना राजीव गांधी फाउंडेशनने पीएमएलए, आयकर कायदा, एफसीआरए या कायद्यातील विविध नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. केंद्र सरकारने ही माहिती समोर आल्यानंतर तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने आतंर मंत्रालयीन समितीची स्थापना केली आहे.

राजीव गांधी फाउंडेशनबरोबरच इतर दोन फाउंडेशनचीही परदेशातून स्वीकारण्यात आलेल्या देणग्यासंदर्भात केंद्र सरकार चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे. यात राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट व इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट यांचा समावेश आहे. या तिन्ही संस्थांच्या देणग्यासंदर्भातील चौकशी आंतर मंत्रालयीन समितीच करणार आहे. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एका व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करताना काँग्रेसवर चीनकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता.

Leave a Comment