एमआयटीचा धक्कादायक अभ्यास; देशात दररोज आढळतील २ लाख ८७ हजार कोरोनाबाधित


नवी दिल्ली – जर लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक औषध किंवा लस सापडली नाही, तर भारतात ही महामारी गंभीर रुप धारण करण्याची शक्यता मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून (एमआयटी) करण्यात आलेल्या अभ्यासात वर्तवण्यात आली आहे. एमआयटीच्या या अभ्यासानुसार, भारतात फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंत दिवसाला २ लाख ८७ हजार कोरोनाबाधितांची नोंद होईल, असे सागंण्यात आले आहे. हा अभ्यास ८४ देशांमधील टेस्टिंग आणि केस डेटाच्या आधारे करण्यात आला. यामध्ये जगभरातील एकूण ६० टक्के लोकसंख्येचा समावेश करण्यात आला होता. यासंदर्भातील वृत्त इंडिया टूडेने दिले आहे.

हा अभ्यास एमआयटीचे संशोधक हाजहीर रहमानदाद, टी वाय लिम आणि जॉन स्टेरमन यांनी केला असून त्यांनी यासाठी साथीचा रोग विशेषज्ञांकडून वापरण्यात येणाऱ्या SEIR (Susceptible, Exposed, Infectious, Recovered) या मॉडेलचा वापर केला. या अभ्यासानुसार २०२१ मधील मार्च-मे महिन्यात उपचार उपलब्ध न झाल्यास जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या २० ते ६० कोटी दरम्यान असेल.

या अभ्यासानुसार, कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत फेब्रुवारी २०२१ च्या अखेरीस भारत पहिल्या क्रमांकावर असेल. यानंतर अनुक्रमे अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि इऱाणचा समावेश असेल. अमेरिकेत दिवसाला ९५ हजार, दक्षिण आफ्रिकेत २१ हजार आणि इराणमध्ये १७ हजार रुग्णांची नोंद होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

तीन मुख्य गोष्टींचा आधार हा अभ्यास करताना घेण्यात आला आहे. पहिली म्हणजे सध्याचे टेस्टिंगचे प्रमाण आणि त्याला मिळणारा प्रतिसाद, दुसरी म्हणजे जर १ जुलै २०२० पासून टेस्टिंगमध्ये दिवसाला ०.१ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. तिसरा आधार म्हणजे जर टेस्टिंग चालू स्तरावर कायम ठेवली परंतु संपर्क दर 8 वर गेला तर म्हणजे एका व्यक्तीमुळे आठ लोकांना संसर्ग होणे.

या मॉडेलमध्ये लवकरात लवकर आणि आक्रमकपणे टेस्टिंग करण्याकडे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लक्ष वेधण्यात आले आहे. उशिरा टेस्टिंग करणे आणि कमी वेगाने करणे धोकादायक ठरु शकते असेही या मॉडेलमध्ये सांगण्यात आले आहे. दिवसाला ०.१ टक्क्यांनी टेस्टिंगमध्ये वाढ केल्यास रुग्णसंख्या कमी होत जाईल असे अभ्यासात सांगण्यात आले आहे.

विशेष म्हणजे जगभरातील कोरोनाबाधितांसंबंधीची आकडेवारी योग्यपणे दिली नसल्याचे एमआयटीने म्हटले आहे. जगभरात एकूण ८ कोटी ८५ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून १८ जून २०२० पर्यंत एकूण सहा लाख मृत्यू झाल्याचा आमचा अंदाज असल्याचा दावा करण्यात आला आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनुसार, १८ जूनपर्यंत जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या ८ कोटी २४ लाख असून ४ लाख ५४ हजार ६१० जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment