देशात गेल्या २४ तासात २२ हजार ५७२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


नवी दिल्ली – देशात काल दिवसभरात २२ हजार ५७२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर ४८२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ७ लाख ४ हजारांवर पोहचला आहे. तर आतापर्यंतची २० हजार ६४२ जणांना आपले जीव गमवावे लागले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशात सध्या कोरोनाचे २ लाख ६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देशात एक लाख लोकसंख्येमागे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचे नमूद केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतात हे प्रमाण १४.२७ असून जगभरातील सरासरी प्रमाण ६८.२९ एवढे आहे. देशभरात एकूण २० हजार १६० मृत्यू झाले आहेत.

६ जुलै रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, इराण, मेक्सिको, ब्राझील, पेरू, अमेरिका, फ्रान्स, इटली, स्पेन आणि ब्रिटन या देशांमध्ये एक लाख लोकसंख्येमागे अनुक्रमे १३७, २३५, ३०२, ३१५, ३९१, ४५६, ५७६, ६०७ आणि ६५१ मृत्यू झाले आहेत. तर आपल्या देशात एक लाखामागे ५०५ कोरोनाबाधित आहेत तर, जगभरात लाखामागे सरासरी १४५३ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. चिलीमध्ये हे प्रमाण सर्वाधिक जास्त म्हणजे १५,४५९, पेरूमध्ये ९,०७० तर अमेरिका, ब्राझील, स्पेन, रशिया, ब्रिटन, इटली, मेक्सिको या देशांमध्ये एक लाख लोकसंख्येमागे अनुक्रमे ८५६०, ७४१९, ५३५८, ४७१४, ४२०४, ३९९६ आणि १९५५ लोक कोरोना बाधित झाले.

Leave a Comment