पुण्याच्या माजी महापौर आणि विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांना कोरोनाची लागण


पुणे – राज्यातील कोरोना सदृश्य परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून या कोरोनाच्या विळख्यात सर्वसामान्यांसह आता राजकीय नेते देखील अडकू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले होते. आता पुण्याच्या माजी महापौर आणि विद्यमान भाजप आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे स्वतः मुक्ता टिळक यांनी दिली आहे. त्याचबरोबर त्यांच्या घरातील इतर सदस्यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली असल्याची माहितीही मुक्ता टिळक यांनी दिली आहे.


मुक्ता टिळक आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, माझी आणि माझ्या आईची कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे. सध्या तरी आम्हा दोघींमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. आम्हाला डॉक्टरांनी घरातच वेगळे राहण्याचा सल्ला दिला आहे. कुटुंबातील इतर सर्व सदस्यांची चाचणी नकारात्मक आली आहे. घरी रहा, सुरक्षित रहा.

तत्पूर्वी पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर यांच्यासह सहा नगरसेवक कोरोना बाधित झाले आहेत, तर आतापर्यंत जवळपास 200 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच महापौर बाधित झाल्यानंतर आता महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल आणि शांतनू गोयल हेदेखील होम क्वारंटाईन आहेत. त्याचबरोबर हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

Leave a Comment