धक्कादायक! कोरोनाग्रस्तांच्या शवांची झाली अदलाबदली, मुस्लिम महिलेवर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हॉस्पिटल प्रशासनाच्या ढिसाळ कामाची देखील अनेक उदाहरणे सध्या समोर येत आहे. आता दिल्लीच्या एम्स ट्रॉमा सेंटरमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये दोन कोरोनाग्रस्त महिलांच्या शवाची आदलाबदली झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंदू महिलेचे शव मुस्लिम कुटुंबाकडे गेले, तर मुस्लिम महिलेच्या शवावर पंजाबी बाग येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिंदू महिलेचे शव दफन करण्यासाठी घेऊन जात असताना या घटनेचा खुलासा झाला. दफन करण्याआधी कुटुंबाने शेवटचे त्यांचा चेहरा बघण्याचा प्रयत्न केला असता, शवांची अदलाबदली झाल्याचे समोर आले. यानंतर कुटुंबाने हॉस्पिटलमध्ये गोंधळ सुरू केला.

या प्रकरणी आता एम्सच्या अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. एका व्यक्तीला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे, तर अन्य एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनुसार, दोन्ही शवांवर मंगळवारी अंत्य संस्कार करण्यात आले. शवांची अदलाबदली झालेल्या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

दरम्यान, कोरोनाग्रस्त व्यक्तीचे शव हे पॅक करून नातेवाईकांना दिले जाते. ते खोलण्याची परवानगी नसते. शवांची ओळख पटण्यासाठी त्यावर मृत व्यक्तीचे नाव किंवा चिन्ह असते.

Leave a Comment