पुणे विद्यापीठात शिवाजी महाराजांवर आधारित एक वर्षाच्या अभ्यासक्रमाची निर्मिती


पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे शालेय अभ्यासक्रमात, पदवी स्तरावर अभ्यासले जातात. छत्रपती शिवाजी महाराज एक नेतृत्व, योद्धे आणि राष्ट्र निर्माते म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यासले जातात. पण केवळ छत्रपती शिवाजी महाराज ही संकल्पना घेऊन पूर्णवेळ अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली नाही. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ही उणीव दूर करण्यासाठी पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित एक वर्षांचा पदव्युत्तर पदविका स्वतंत्र अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे.

यंदापासून छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित एक वर्षांचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागात पदव्युत्तर स्तरावर पहिल्यांदाच सुरू करण्यात येत आहे. ‘पीजी डिप्लोमा इन छत्रपती शिवाजी महाराज अॅज ए नेशन बिल्डर’ हा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी पुढाकार घेतला.

हा अभ्यासक्रम नव्या शैक्षणिक वर्षांत राबवला जाणार आहे. या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणत्याही विद्याशाखेची पदवी ही अट आहे. अभ्यासक्रमाला एकूण वीस विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, त्यातील काही जागा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील. या अभ्यासक्रमात वर्गातील अध्यापनासह क्षेत्रभेटी, प्रकल्प आदींचा समावेश असेल, अशी माहिती संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी दिली. अद्याप पर्यंत देशातील कोणत्याही विद्यापीठात अशा प्रकारचा अभ्यासक्रम अद्याप उपलब्ध नाही. त्याचबरोबर विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेने या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे.

Leave a Comment