धक्कादायक : कोरोनाग्रस्ताचे शव रस्त्यावर टाकून अँब्युलन्स कर्मचाऱ्यांनी काढला पळ

देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसबद्दल नागरिकांमध्ये भिती आहे. मात्र अनेकदा कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या शवाचे प्रशासनातर्फे योग्यरित्या अंत्यसंस्कार केले जात नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मध्य प्रदेशच्या भोपाळमधील अशीच एक घटना समोर आली असून, येथील रुग्णवाहिका चालकाने कोरोनाग्रस्ताचे शव तसेच हॉस्पिटल बाहेर ठेऊन पळ काढला. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

सीसीटिव्हीमध्ये दिसत आहे की पीपीई किट घातलेले दोन रुग्णवाहिका कर्मचारी एक शव गाडीच्या बाहेर काढतात. त्यानंतर शव स्ट्रेचरवरून जमिनीवर ठेवतात व नंतर पळून जातात. एनडीटिव्हीच्या रिपोर्टनुसार, विद्युत विभागात काम करणाऱ्या या व्यक्तीला किडनीसंबंधी समस्या होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला भोपाळच्या पीपुल्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर व्यक्तीला चिरायू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

मृत व्यक्तीच्या मुलाने सांगितले की, जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले जात होते, त्यावेळी ते जिंवत होते. तो म्हणाला की, मला माहित नाही रुग्णवाहिकेत काय झाले. त्यांना चिरायू हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यास का सांगण्यात आले व या प्रकारे शव रस्त्यावर का सोडले ? ही दोन्ही हॉस्पिटलची चूक असून, त्यांनी आम्हाला याबाबत काहीही माहिती दिली नाही.

दोन्ही हॉस्पिटल या प्रकरणात एकमेकांवर आरोप करत आहे. मॅजिस्ट्रेटने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. भोपाळचे आयुक्त अविनाळ लवानिया यांनी पीपुल्स हॉस्पिटलकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

Leave a Comment