AIIMS Patna मधून होणार भारत बायोटेकच्या संभाव्य लसीच्या मानवी चाचणीची सुरूवात


नवी दिल्ली – कोरोनाच्या ओढावलेल्या संकटात देशातील नागरिकांसाठी एक आनंददायी बातमी समोर आली आहे. कारण आयसीएमआर आणि भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक संभाव्य लस Covaxin आता मानवी चाचणीसाठी सज्ज झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या लसीची पहिल्या टप्प्यात 375, त्यानंतर 750 जणांवर चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे DCGI कडून मानवी चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यांना परवानगी असलेल्या या लसीची आता एकूण अंदाजे 1000 लोकांवर चाचणी केली जाणार आहे. आयसीएमआरकडून देशभरातील एकूण 12 मेडिकल संस्थांना निवडण्यात आले आहे. त्यातील AIIMS Patna मध्ये या आठवड्यात मानवी चाचणीला सुरूवात होईल.

Covaxin या लसीचा प्राण्यांवर घेतल्या चाचणीचे सकारात्मक परिणाम आल्यामुळे आता मानवी चाचणी आणि त्याच्या निकालाबद्दल उत्सुकता आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 1000 त्यानंतर पुढील टप्प्यांत मानवी चाचणीचे प्रमाण देखील वाढवले जाणार आहे. दरम्यान एकूण 3 टप्प्यांमधून जाणार्‍या या लसीला पुढे निकाल स्पष्ट करण्यासाठी अंदाजे 6-8 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्याचबरोबर हैदराबादच्या निजाम इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्येही मानवी चाचणीसाठी उमेदवार निवडण्याचे काम सुरू झाले आहे.

सध्या कोरोना व्हायरस SARS-CoV-2 चे काही नमुने निष्क्रिय करून त्यांना सुदृढ शरीरात इंजेक्ट केले जाणार आहेत. दरम्यान नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाल्यानंतर आता शरीरात अ‍ॅन्टीबॉडीज तयार होतात का? त्या या व्हायरसचा सामना करू शकतात का? याचे निरीक्षण केले जाणार आहे. या लसीची 22 ते 50 या वयोगटातील व्यक्तींवर चाचणी केली जाणार आहे.

15 ऑगस्ट पर्यंत Covaxin या लसीचे अहवाल आयसीएमआरकडून तपासल्या जाण्याचे आणि ती बाजारात उपलब्ध करण्यासाठी सादर करण्याबाबत एका पत्राद्वारा माहिती देण्यात आली होती. पण नंतर जागतिक पातळीवर असणार्‍या प्रोटोकॉल प्रमाणेच ही लस निर्माण केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. या लसीसाठी महाराष्ट्रात नागपूरमधून उमेदवारांवर चाचणी केली जाणार आहे.

Leave a Comment