टीक-टॉकसह चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या तयारीत अमेरिका


वॉशिंग्टन – भारत सरकारने टीक-टॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता ही बंदी घालण्याच्या तयारीत अमेरिकादेखील आहे. अमेरिका चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याची माहिती फॉक्स न्यूजशी बोलताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी दिली आहे. भारत सरकारने लडाख सीमेवरील धुमश्चक्रीनंतर चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर २९ जून रोजी टीक-टॉक, शेअरइट, ब्युटी प्लस या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे.

यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार माइक पोम्पिओ यांनी अमेरिका टीक-टॉकसह चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे. या विषयावर अद्याप राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झालेली नाही. पण ही बाब अशी आहे की आम्ही त्यावर निश्चितच विचार करत असल्याचे माइक पोम्पिओ यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

Leave a Comment