देशात काल दिवसभरात अमेरिकेपेक्षाही जास्त मृत्यूंची नोंद


नवी दिल्ली – जगासह आपल्या देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही, त्यातच काल दिवसभरात देशात ४२५ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशातील एका दिवसातील मृत रुग्णांची संख्या कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेपेक्षाही जास्त आहे. २९ लाख कोरोनाबाधित रुग्ण असणाऱ्या अमेरिकेत मागील २४ तासात २७१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ब्राझीलमध्ये भारतापेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली आहे. ब्राझीलमध्ये ६०२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आतापर्यंत देशात १९ हजार ६९३ जणांनी या जीवघेण्या रोगामुळे आपला जीव गमावला आहे. तर दूसरीकडे अमेरिकेत १ लाख २९ हजार ९४७ मृत्यूंची नोंद झाली असून ही संख्या ब्राझीलमध्ये ६४ हजार ८६७ आहे. एका आठवड्यापूर्वी ३ टक्के आणि दोन आठवड्यांपूर्वी ३.२ टक्के असणारा भारतातील मृत्यूदर २.८ वर पोहोचला आहे. अमेरिका आणि ब्राझिलशी तुलना करता तेथील मृत्यूदर अनुक्रमे ४.५ आणि ४.१ टक्के आहे. जागतिक मृत्यूदर ४.७ टक्के आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर अमेरिका, ब्राझिल आणि भारत आहे.

तर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सात लाखांवर पोहोचला आहे. मागील २४ तासांत २४ हजार २४८ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या ६ लाख ९७ हजार ४१३ झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने काल सकाळी म्हटले होते. पण, सायंकाळपर्यंत विविध राज्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे देशातील रुग्णसंख्येने सात लाखांचा टप्पा पार केल्याचे स्पष्ट झाले.

मागील पाच दिवसांमध्ये देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात १ लाखांनी वाढ झाली असून सलग तीन दिवस प्रतिदिन २० हजारांहून अधिक रुग्णवाढ झाली आहे. कोरोनासाठी झालेल्या चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित नमुन्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ६.७३ टक्के आहे. दिल्लीमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. पण, कोरोनाबाधित रुग्णांचे सरासरी प्रमाण कमी होऊ लागले असल्याचा दावा करण्यात आला आहे. दिल्लीत प्रतिदिन १८ हजार चाचण्या घेतल्या जात आहेत.

Leave a Comment