सहा महिन्यात कोरोनाची कोणतीच लस येणे शक्य नाही !


पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील बहुतेक देश अहोरात्र प्रयत्न करत असतानाचा काही दिवसांपूर्वी भारतीय कंपनी भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस येत्या स्वातंत्र्यदिनी भारतीय बाजारपेठेत येईल, अशी घोषणा आयसीएमआरने केली होती. पण त्यावर देशातील तज्ञांनी आक्षेप घेतल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लस 2021 पर्यंत तरी येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकडून सर्वांना आशा होती. पण आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लसदेखील यावर्षी येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण ऑक्सफर्डची लस बाजारपेठेत यायला अजून 6 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तयार करत असलेल्या लसीत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाची भागीदारी आहे. याबाबत माहिती देताना इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पुनावाला यांनी सांगितले की ऑक्सफर्डची लस यायला अजून सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. याचाच अर्थ असा की या वर्षात ऑक्सफर्डची लस येणार नाही.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधे निर्माण करणारी कंपनी असून औषध निर्माण करणारी जगातील सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीने सीरम इन्स्टिट्युटनेही कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे.

दरम्यान जगभरात कुठेही कोरोनाची लस यायला आणखी किमान सहा महिने लागणार, असल्याचे पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डॉ. राजीव ढेरे यांनी याआधीच स्पष्ट केले होते. कोरोना प्रतिबंधक लस येईपर्यंत काय करायला हवे याबाबत डॉ. राजीव ढेरे यांनी मार्गदर्शन केले आहे.

पुढील एक वर्ष मास्कला तुमच्या पेहरावाचा आणि सौंदर्याचा भाग बनवून घ्या. कोरोनासोबतचा लढा वैयक्तिक स्तरावर लढण्यासाठी एक ते दीड मीटर अंतर ठेवा आणि नाका-तोंडाला हात लावण्यापूर्वी हात साबणाने धुवून घेतल्याचे सुनिश्चित करा. त्याचबरोबर ज्यांना रक्तदाबासारखे आजार आहेत त्यांनी जास्त घराबाहेर पडू नये, असा सल्ला डॉ. ढेरे यांनी दिला आहे.

तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका आणि एपिडेमोलॉजिस्ट सुनेत्रा गुप्ता यांनी कोरोनाची लस येईल, पण कदाचित या लशीची गरजही पडणार नसल्याचा दावा केला आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सुनेत्रा गुप्ता म्हणाल्या, सामान्यत: निरोगी लोक, जे वृद्ध नाहीत, कमजोर नाहीत आणि त्यांना इतर कोणता आजार नाही अशा लोकांना कोरोनाला घाबरण्याची काहीच गरज नाही, हा फ्लूप्रमाणेच असेल. इन्फ्लूएंझापेक्षादेखील या व्हायरसमुळे कमी लोकांचा मृत्यू होईल अशी मला आशा आहे.

कोरोना प्रतिबंधक लस तयार करणे सोप आहे आणि ही लस चांगली काम करत आहे, याचे पुरावे लवकरच आपल्याकडे असतील. पण लस जेव्हा येईल तेव्हादेखील ती सर्वप्रथम कमजोर आणि जास्त धोका असलेल्या लोकांना दिली जाईल. बाकी लोकांना व्हायरसबाबत चिंता करण्याची गरज नाही. कोरोनाची महासाथ नैसर्गिकरित्याच संपेल. हा व्हायरस इन्फ्लूएंझाप्रमाणे लोकांच्या आयुष्याचा भाग होऊन जाईल, असे सुनेत्रा यांनी सांगितले.

Leave a Comment