अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार, केंद्राने दिली परवानगी

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांना आरोग्य मंत्रालयाच्या कोव्हिड-19 सुरक्षा दिशानिर्देशांचे पालन करत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास सांगितले आहे. गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, केंद्रीय उच्च शिक्षा सचिवांना लिहिलेल्या पत्रात विद्यापीठ आणि संस्थेंद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांना परवानगी देण्यात आलेली आहे. गृहमंत्रालयाच्या पत्रानुसार, शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा अनिवार्य असेल व यूजीसीच्या गाईडलाईन्सनुसार घेतली जाईल.

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा आणि हरियाणासह अनेक राज्यांनी उच्चशिक्षण परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मागील कामगिरीच्या आधारावर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गुजरात सरकारने देखील अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र काही तासातच हा निर्णय त्यांनी बदलला होता. राजस्थान सरकारने देखील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

काही दिवसांपुर्वीच महाराष्ट्र राज्य सरकारने देखील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता केंद्राच्या आदेशानंतर या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत.

Leave a Comment