सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश


पुणे – आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे यांनी अधिकृत प्रवेश केला. त्यांचा पक्ष प्रवेश खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाला. प्रिया बेर्डे यांचे चिरंजीव अभिनय हे देखील यावेळी उपस्थित होते. प्रिया बेर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु होती.

राजकारणात प्रवेश करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच निवड का केली? त्यामागे काय कारण आहेत, ते प्रिया बेर्डे यांनी सांगितले. कलेची आणि कलाकारांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जाण आहे, त्याचबरोबर त्यांचा प्रचंड मोठा अनुभव आहे. कला, नाटय क्षेत्रातील अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिल्याचे प्रिया बेर्डे यांनी म्हटले. यासंदर्भातील वृत्त टीव्ही ९ वृत्तवाहिनीने दिले आहे.

कलाकारांबद्दल मला तळमळ वाटते. त्याचबरोबर कलाकार तंत्रज्ञानसाठी काम करायचे आहे आणि राष्ट्रवादीचे पाठबळ त्यासाठी मिळत असले तर मला काम करायला निश्चित आवडेल, असे प्रिया बेर्डे यांनी सांगितले. अभिनेत्री की, नेता या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, मी स्वत:ला कधीही नेता म्हणवणार नाही. मीच नाही, माया जाधव आम्ही सगळेच मिळून एकत्र काम करणार आहोत. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात प्रवेश करत असल्याची चर्चा आहे, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, माझ्या असा विचारही डोक्यात नाही. मला तळागाळातून काम करायचे आहे. तालुका जिल्ह्यांमध्ये फिरायचे आहे. लोककलावंत, तमाशा कलावंतांचे समस्या जाणून घ्यायच्या असल्याचे त्यांनी उत्तर दिले.

Leave a Comment