औरंगाबादमध्ये पुन्हा एका आठवड्यासाठी कठोर लॉकडाउन जाहीर


औरंगाबाद – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत निर्बंध शिथील करुन अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न सुरु असतानाच राज्यातील अनेक ठिकाणी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन जाहीर केले जात आहे.

राज्यातील भिवंडी, अंबरनाथ, ठाणे, मीरा भाईंदर, रत्नागिरी, नवी मुंबई यांच्यासह अनेक ठिकाणी लॉकडाउन जाहीर झालेला असताना आता औरंगाबादमध्येही पुन्हा एका आठवड्यासाठी कठोर लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. हा लॉकडाउन औरंगाबाद शहर आणि वाळुंज परिसरात जाहीर करण्यात आला आहे. १० ते१८ जुलैदरम्यान कडक निर्बंध लागू असणार आहेत. लोकांना जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये जोपर्यंत लोक सहभागी होत नाहीत तोपर्यंत लॉकडाउन यशस्वी होणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दरम्यान सोमवारी सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात १५० नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यामुळे आता औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या तब्बल ६६८० वर पोहोचली आहे. सोमवारी आढळलेल्या १५० कोरोनाबाधितांमध्ये औरंगाबाद शहरातील १०१ व ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ८५ पुरुष ६५ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत आढळलेल्या ६६८० करोनाबाधितांपैकी ३३७४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेली आहे. ३१९६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर, कोरोनामुळे आतापर्यंत उपचारादरम्यान ३१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment