भारत बायोटेकनेही खोडला ICMR चा दावा; 2021 पर्यंत येणार नाही कोरोना प्रतिबंधक लस


नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावच्या संकटात भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (ICMR) देशातील नागरिकांना एक आनंदाची बातमी दिली होती. 15 ऑगस्टपर्यंत भारताची कोरोना प्रतिबंधक लस कोवाक्सिन लाँच होणार अशी शक्यता आयसीएमआरने वर्तवली होती. पण एवढ्या लवकर लस उपलब्ध होण्याबाबत अनेक तज्ज्ञांनी शंका उपस्थित केल्यानंतर 2021 पर्यंत कोरोना लस येणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले होते. यानंतर आता ही लस तयार करणाऱ्या भारत बायोटेकनेही 2021 पर्यंत येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भारत बायोटेकच्या कोवाक्सिन लसीची मानवी चाचणी 7 जुलैला होणार असल्याचे आयसीएमआरने म्हटले होते. पण आता भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीची चाचणी 13 जुलैला सुरू होणार आहे. या लसीची दोन टप्प्यात चाचणी होणार आहे. हे दोन टप्पे संपण्यासाठी 6 महिने लागतील. ट्रायल पूर्ण होण्यासाठी एक वर्षे आणि तीन महिने लागतील. त्यामुळे 2021 पर्यंत ही लस येणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

जगभरातील अनेक देश कोरोना व्हायरसवर लस शोधण्याचे काम करत आहेत. त्यात भारतही आघाडीवर असून दोन कंपन्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचण्यांसाठी परवानगीही मागितल्यानंतर देशात नव्या वादाला सुरूवात झाली होती. देशात कोरोनावर लस 15 ऑगस्टपर्यंत येऊ शकते, असे आयसीएमआरने म्हटले होते. त्यावर शंका उपस्थित करण्यात येत होती. या वादावर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने भाष्य केले असून ही लस बाजारात 2021पर्यंत येणार नसल्याचे म्हटल्यानंतर आता ही लस बनवणाऱ्या भारत बायोटेकने देखील अशाच प्रकारचे भाष्य केले आहे.

जगभरातील 140 कंपन्यांची औषधे मानवी चाचणीच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचली असून भारताची त्यात 11 औषधे आहेत. त्यात कोवेक्सिन आणि ZyCov-D या दोन औषधांच्या मानवी चाचणीची घोषणाही झाली आहे. दरम्यान आयसीएमआरच्या घोषणेनंतर यावर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली होती. अशा कामांमध्ये घाई करू नये असाही सल्ला दिला गेला होता. त्यानंतर विज्ञान मंत्रालायाने स्पष्टीकरण देत आयसीएमआरचा दावा खोडून काढला आहे. औषध वापरासाठी येण्यापूर्वी अनेक परिक्षणांमधून त्याला जावे लागते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या प्रक्रियेत काही सवलत जरी दिली गेली तरी मुलभूत नियमांना डावलले जाऊ शकत नाही.

Leave a Comment