फोन कॉल आणि इंटरनेटसह सर्व सेवा-सुविधा महाग होण्याची शक्यता


नवी दिल्ली – फोन कॉल आणि इंटरनेटसह सर्व सेवा-सुविधांचा वापर पुढील 12 ते 18 महिन्यांमध्ये महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण फोन कॉल-इंटरनेटसह सर्व सेवा-सुविधांचे दर येत्या दीड वर्षात दोन वेळेस वाढवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्याची दूरसंचार क्षेत्रातील संरचना लाभदायक नसून यामध्ये योग्य परतावा ऑपरेटरला मिळत नसल्यामुळे टेलिकॉम सेक्टरमधील शुल्कवाढ अपरिहार्य आहे. परिणामी दरवाढ येत्या 12 ते 18 महिन्यात दोन वेळेस होऊ शकते, असे आघाडीची कन्सल्टन्सी EY इंडियाने म्हटले आहे.

तातडीने सध्याच्या परिस्थितीत दरवाढ होणार नाही, पण ही वाढ पुढील 12 ते 18 महिन्यात दोन टप्प्यात केली जाऊ शकते. येत्या सहा महिन्यांमध्येच त्यातील पहिली दरवाढ होण्याची शक्यता आहे, असे EY चे प्रशांत सिंघल म्हणाले. मी ही वाढ होईलच असे म्हणत नाही, पण या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांसाठी 12 ते 18 महिन्यात दर वाढवणे अपरिहार्य आहे. नियामक हस्तक्षेपाने ही दरवाढ होते की टेलिकॉम उद्योग स्वत: ही दरवाढ करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही टेलिकॉम कंपन्यांनी दरवाढ केली होती.

Leave a Comment