सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे


मुंबई – १४ जून रोजी आपल्या राहत्या घरी सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली. संपूर्ण हिंदी सिनेसृष्टी त्याच्या आत्महत्येच्या घटनेने हळहळली. पण त्यानंतर हिंदी सिनेसृष्टीत कलाकारांवर कसा अन्याय होतो. घराणेशाही कशी चालते याबाबत अनेक लोकांनी भाष्य करण्यास सुरुवात केली. यावरुन हिंदी चित्रपटसृष्टीत, जो वाद उसळला आहे त्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


यासंदर्भात राज ठाकरे यांनी ट्विट केले असून, ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपटसृष्टीत वाद उसळला आहे आणि माध्यमातील काही घटकांकडून त्या वादाचा संबंध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी जोडला आहे. या वादाच्या अनुषंगाने यापुढे कलाकारांवर अन्याय झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळवा अशा आशयाच्या बातम्याही काही ठिकाणी प्रसारित झाल्या. मी येथे स्पष्ट करु इच्छितो, या वादाचा आणि माझ्या पक्षाचा किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही शाखेचा कुठलाही संबंध नाही. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

Leave a Comment