पुण्यातील भाजपच्या माजी आमदाराला कोरोनाची लागण


पुणे – भारतीय जनता पक्षाचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी ट्विट करुन दिली आहे. योगेश टिळेकर यांना भाजपच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या प्रदेश कार्यकारिणीत ओबीसी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.


दरम्यान योगेश टिळेकर यांनी यासंदर्भात माहिती देताना, दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची #COVID-19 ची तपासणी करून घेतली असतात, तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

तत्पूर्वी कालच पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. स्वतः मोहोळ यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली होती. कोरोनाविरोधात लढा देताना खुद्द महापौरांना कोरोनाची लागण झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर काल पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आणि महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले.

Leave a Comment