गृहमंत्र्यांनी केलेल्या पोलिसांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी केल्या रद्द


मुंबई : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील कुरबुर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. त्यातच या महाविकास आघाडीने मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ४ दिवसात रद्द करण्याचा अजब कारभार करून दाखवला आहे. मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या २ जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बदल्या केल्या. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बदल्या ४ दिवसातच रद्द केल्यामुळे राज्यातील सरकारमधील मतभेद आणि समन्वयाचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

२ जुलै रोजी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बदल्या केल्या होत्या. यात परमजित दहिया, प्रशांत कदम, गणेश शिंदे, डॉ. रश्मी करंदीकर, शहाजी उमप, डॉ. मोहन दहिकर, विशाल ठाकूर, संग्रामसिंह निशाणदार, प्रणय अशोक आणि नंदकुमार ठाकूर यांचा समावेश होता.

बदल्या झालेल्या जवळपास सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या बदलीच्या ठिकाणी पदभार स्वीकारून कामही सुरू केले होते. पण या सर्व पोलीस उपायुक्तांच्या बदल्या अवघ्या ४ दिवसात रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बदल्या रद्द करताना या अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या पूर्वीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रविवार असूनही या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.

गुरुवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मुख्यमंत्र्यांनी रविवारी रद्द केल्यामुळे सरकारमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता गृहमंत्र्यांनी या बदल्या केल्या होत्या का? त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांवर विश्वास नसल्यामुळे त्यांनी बदल्या रद्द केल्या का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave a Comment