राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अभिनेत्री प्रिया बेर्डे


पुणे – मागील काही दिवसांपासून सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बेर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. पण चर्चेला पूर्णविराम देत प्रिया बेर्डे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रिया बेर्डे येत्या ७ जुलै रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांनी ही प्रसार माध्यमांशी बोलत असताना माहिती दिली.

चित्रपटसृष्टीमध्ये पडद्यामागे राहून काम करणाऱ्या लोकांसाठी काही तरी करता यावे, यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मला चित्रपटसृष्टीत पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करता येईल, त्यामुळे मी येत्या ७ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात प्रवेश करणार आहे. तुमचा आशीर्वादाची गरज असल्याचे प्रिया बेर्डे म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रिया बेर्डे यांची नियुक्ती होणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या प्रिया बेर्डे या पुण्यातच लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचा कारभार चालवत असल्यामुळे पुण्यामधूनच नवीन काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ७ जुलै रोजी अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे हेदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment