कोरोना उपचारासाठी सरकारने जारी केले नवीन दिशानिर्देश

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आरोग्य मंत्रालयाने नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत. या अंतर्गत आता कोरोना उपचारावर प्रभावी ठरलेल्या रेमडेसिव्हिरचा डोस कमी करण्यात आला आहे. आता या औषधाला 6 ऐवजी 5 दिवस रुग्णांना दिले जाणार आहे. रेमडेसिव्हिर हे एक अँटी व्हायरल औषध असून, याला कोरोनाग्रस्तांना दिले जाते. या संदर्भात आज तकने वृत्त दिले आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, हे औषध रुग्णांना इंजेक्शन स्वरूपात दिले जाईल. पहिल्या दिवशी रुग्णाला रेमडेसिव्हिरचा 200 मिलिग्रॅम डोस इंजेक्शन स्वरूपात दिला जाईल. यानंतर पुढील 4 दिवस 100-100 मिलिग्रॅमचा डोस दिला जाईल.

आरोग्य मंत्रालयाने 13 जूनला रेमडेसिव्हिरचा वापर करण्याची परवानगी दिली होती. आरोग्य मंत्रालयाने आता मर्यादित वापरासह इमर्जेंसी स्थितीतच रेमडेसिव्हिरचा वापर करण्यास सांगितले आहे. मात्र हे औषध किडनी, लिव्हरचा आजार, गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या महिला आणि 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देण्यात येणार नाही.

मंत्रालयाने हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या बाबत देखील सल्ला दिला आहे. मंत्रालयानुसार या औषधाचा वापर केवळ आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच करावा. प्रकृती गंभीर असलेल्या व्यक्तीस हे औषध दिले जाऊ नये.

Leave a Comment