खरे सोने घ्यावे की आरबीआय गोल्ड बाँड्स, जाणून घ्या तुमच्यासाठी आहे कोणता योग्य पर्याय ?

सण-समारंभाच्या काळात तुम्ही सोने खरेदी करण्याची योजना बनवत आहात ? असे असेल, तर तुम्ही सोन्यात गुंतवणुकीसाठी असलेले वेगवेगळे पर्याय जाणून घेतले पाहिजे. यामध्ये फिजिकल सोने, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ईटीएफएस) आणि सॉवरेन गोल्ड बाँड्सचा समावेश आहे. यामध्ये का गुंतवणूक करायला हवी, हे जाणून घेऊया.

फिजिकल सोने –

फिजिकल सोने म्हणजे आपण दैनंदिन आयुष्यात वापरतो असे सोने. सहज हाताळता येत असल्याने या सोन्याशी आपले एक भावनिक नाते असते. याशिवाय हे सोने खरेदी करणे अगदीच सोपे असते. हे सोने तुम्ही दागिने, बिस्किट अथवा नाण्याच्या स्वरूपात देखील खरेदी करू शकता. हे सोने खरेदी करण्याचे काही फायदे व तोटे आहेत.

फिजिकल सोने ही अशी एक मालमत्ता आहे जी संपुर्णपणे खाजगी आणि गोपनिय असते. कोणत्याही मध्यस्थाशिवाय हे सोने खरेदी करता येते. बाजारातील भावानुसार हे सोने तुम्ही खरेदी करू शकता व याच्यात किती गुंतवणूक करायची यावर मर्यादा देखील नसते. करासाठी तुमच्याकडे पुरावा देखील असतो. जगभरात याचा स्विकार होतो, सोबतच करात देखील सवलत मिळते. याच्या तोट्याबद्दल सांगायचे तर, दागिन्यांचे पुनर्विक्री मूल्य सोन्याच्या इतर प्रकारांपेक्षा तुलनेने कमी आहे. चोरीचा धोका देखील असतो व सोन्याची शुद्धता ही मोठी चिंता ठरू शकते.

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ईटीएफएस) –

सोन्यातील हा गुंतवणुकीचा प्रकार एक्सचेंजच्या माध्यमातून चालतो. तुम्ही सोन्याच्या बाजार मुल्यानुसार याची खरेदी करू शकता. मात्र यासाठी तुमचे शेअरहोल्डर ट्रेडिंग अकाउंट असणे गरजेचे आहे. फिजिकल सोन्याच्या तुलनेत यात धोका खूप कमी असतो. 1 ग्रॅम सोन्यापासून तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. याशिवाय 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी तुम्ही ईटीएफएस ठेवल्यास करात लाभ मिळतो. मात्र ईटीएफएसचा सर्वात मोठा तोटा म्हणजे प्रत्येक वेळी ईटीएफएस खरेदी-विक्री वेळी तुम्हाला ब्रोकरला पैसे द्यावे लागतात.

सॉवरेन गोल्ड बाँड्स –

सॉवरेन गोल्ड बाँड्स हे सरकारच्या अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जारी करत असते. कर्ज घेताना याचा उपयोग तारण म्हणून देखील करता येतो. दागिन्यांच्या तुलनेत गोल्ड बाँड्सच्या चोरीचा धोका खूप कमी असतो. सरकार यावर वर्षाला 2.5 टक्के व्याज देते. व्याजावर कोणत्याही प्रकारचा टीडीएस देखील लागत नाही. सॉवरेन गोल्ड बाँड्सचा तोटा सांगायचा तर याचा लिक्विडिटी कालावधी हा 8 वर्ष असतो. सोबतच यासाठी 5 वर्ष लॉक-इन कालावधी आहे. तुम्ही 5 वर्षानंतरच या बाँड्सद्वारे पैसे काढू शकता.

Leave a Comment