बुलेटमधून फटाक्यासारखा आवाज काढणे पडले महागात, 68 हजारांचे चलान आणि बाईक जप्त

भारतात रॉयल एनफिल्डच्या बुलेटची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. अनेकजण आवाजासाठी या बाईकचे सायलेंसर बदलून दुसरे लावतात. अनेकदा रस्त्यावर सुसाट जाताना या बुलेटमधून निघणारा फटाक्या सारखा आवाज तुम्ही देखील ऐकला असेल. एका चालकाला असा फटाक्यासारखा आवाज काढणे मात्र चांगलेच महागात पडले आहे.

हरियाणाच्या कॅथल जिल्ह्यात सायलेंसरद्वारे फटाक्याचा आवाज काढल्याने दोन चालकांचे तब्बल 68,500 रुपयांचे चलान कापण्यात आले आहे. सोबतच एक बुलेट देखील जप्त करण्यात आली. कॅथल पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले की, सायलेंसरमधून फटाक्याचा आवाज काढून लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोन बुलेट चालकांचे 68,500 रुपये चलान कापण्यात आले. सोबतच नियमांचे उल्लंघन केल्याने एक बुलेट जप्त करण्यात आली.

सोशल मीडियावर अनेक युजर्सनी पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले. तर काही युजर्सनी अशी कारवाई सर्व ठिकाणी करावी असेही म्हटले.

Leave a Comment