पबजीच्या व्यसनामुळे मुलाने उडवली पालकांची आयुष्यभराची लाखो रुपयांची कमाई

पबजी मोबाईल गेम आधीपासूनच लोकप्रिय आहेत. त्यात आता लॉकडाऊनच्या काळात मोकळ्या वेळेत याची लोकप्रियता आणखीन वाढली. अनेकांना या गेमचे व्यसन देखील लागते, त्यामुळे अनेकदा या गेमवर बंदी घालण्याची मागणी देखील वाढते. यातच आता एका रिपार्टनुसार पंजाबच्या एका तरूणाने पबजी मोबाईल गेममध्ये खरेदी करण्यासाठी पालकांच्या बँक अकाउंटमधील तब्बल 16 लाख रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे.

पंजाबच्या खागर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय तरूणाच्या वडिलांनी हे पैसे उपचाराच्या खर्चासाठी जमा केले होते. ही त्यांची आयुष्यभराची कमाई होती. ट्रिब्यून इंडियाच्या वृत्तानुसार, या तरुणाकडे पालकांच्या तीन बँक खात्यांची माहिती होती. याचा वापर तो आपल्या पबजी मोबाईल अकाउंटला अपग्रेड करण्यासाठी करत असे. कथितरित्या या तरुणाने आपल्या मित्रांसाठी देखील इन- अ‍ॅप खरेदी केली आहे. कुटुंबाला याबाबत बँक स्टेटमेंटद्वारे माहिती मिळाली.

तरुणाचे वडील सरकारी कर्मचारी असून, ते आजारी असतात. 17 वर्षीय युवक आपल्या आईसोबत राहत असे व वडिलांची पोस्टिंग दुसऱ्या ठिकाणी होती. वडिलांनी सांगितले की, मुलाने सर्व व्यवहार करण्यासाठी आईच्या मोबाईल फोनचा वापर केला. पालकांना वाटले की मुलगा स्मार्टफोनचा वापर ऑनलाईन अभ्यासासाठी करत आहे. या घटनेनंतर मुलाने मोबाईलचा अधिक वापर करू नये यासाठी त्याला एका रिपेयरिंगच्या दुकानावर कामाला लावण्यात आले आहे.

Leave a Comment