सध्याच्या घडीला कोरोनावर कोणतेही औषध किंवा उपाय उपलब्ध नाही; WHOच्या विशेष दूतांची माहिती


नवी दिल्ली – संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढावलेले असतानाच जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी कोरोनावर परिणामकारक लस मिळवण्यासाठी जगाला अजून अडीच वर्ष वाट पहावी लागेल असे मत इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मांडले आहे. सध्या फक्त परिणामकारक लस मिळणे महत्त्वाचे नसून, तिचे मुबलक प्रमाणात उत्पादन होणे देखील गरजेचे असल्यामुळे एवढा कालावधी त्यासाठी लागेल असे, त्यांचे म्हणणे आहे. कोरोनावर सध्याच्या घडीला कोणतेही औषध किंवा उपाय उपलब्ध नाही. जर असा दावा कोणी करत असेल तर त्यांच्याकडे पुरावा मागितला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीचे काम सुरु असून अनेक देशांनी याची मानवी चाचणी देखील सुरु केली आहे. यासंबंधी त्यांना विचारले असता डेव्हिड नाबारो यांनी सांगितले की, आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे कोरोनाची एखाद्या व्यक्तीला लागण झाल्यानंतर त्याला पुन्हा त्याचा संसर्ग होणार नाही, याची काहीच माहिती आपल्याकडे नाही.

लस आल्यानंतरही ती एखाद्या दिल्यानंतर तो पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही याची खातरजमा करण्यास वेळ लागेल. त्याचबरोबर या लसीसंदर्भात अनेक गोष्टी अद्याप सिद्ध व्हायच्या असल्याचे डेव्हिड नाबारो यांनी सांगितले आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रस्तावित लस सुरक्षित आहेत का? म्हणजे ती एखाद्याला दिल्यानंतर त्याचे वेगळे परिणाम तर होणार नाहीत ना? तुम्ही जेव्हा लसीचा वापर करता तेव्हा त्याचे काही उलट परिणाम होणार नाहीत याची काळजी घेणेही महत्त्वाचे असल्याचेही डेव्हिड नाबारो यांनी सांगितले आहे.

प्रतिबंधक लस २०२१ च्या सुरुवातीला आली तरी जास्त मदत होणार नाही. कारण ती लस जगभरात उपलब्ध व्हावी यासाठी आपल्याला मुबलक प्रमाणात त्याची गरज लागणार आहे. कोरोनाचा फैलाव जास्त आहे, त्याप्रमाणे त्याची प्राथमिकता ठरवावी लागेल. ती लस श्रीमंत आणि गरीब दोन्ही देशातील लोकांना उपलब्ध झाली पाहिजे, असे डेव्हिड नाबारो यांनी म्हटले आहे.

कोरोना प्रतिबंधक लस जगातील प्रत्येकाला मिळावी यासाठी किती वेळ लागेल ? असे विचारले असता, त्यांनी मला वाटते यासाठी किमान अडीच वर्षांचा कालावधी लागू शकतो. यामुळेच मी प्रत्येकाला त्याप्रमाणे नियोजन करा आणि आपल्या जीवनशैलीत पुढील अडीच वर्षांसाठी त्याप्रमाणे बदल करा. जर हे लवकर झाले तर सर्वात आधी मी आनंदाने उड्या मारेन, असेही डेव्हिड नाबारो यांनी म्हटले आहे.

Leave a Comment