स्वातंत्र्य दिनी बाजारात येऊ शकते देशातील पहिली कोरोना प्रतिबंधक COVAXIN लस


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत असून त्यातच कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी सरकारच्या चिंतेचा विषय बनत आहे. अशातच आता देशातील नागरिकांना दिलासा देणारी एक माहिती समोर आली आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्वदेशी COVAXIN ही पहिली लस स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी बाजार येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून भारत बायोटेकने ही लस तयार केली आहे. ही लस भारत बायोटेक आणि आयसीएमआरद्वारे लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारत बायोटेकच्या COVAXIN या लसीच्या मानवी चाचणीसाठी काही दिवसांपूर्वी मान्यता देण्यात आली होती. आयसीएमआरकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार मानवी चाचणीसाठी ७ जुलैपासून नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. यानंतर सर्व चाचण्या योग्यरित्या पार पडल्या तर ही लस १५ ऑगस्टपर्यंत बाजारात दाखल करण्यात येईल. असे झाल्यास भारत बायोटेकची COVAXIN ही लस कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी सर्वप्रथम उपलब्ध होणार आहे.

आयसीएमआर आणि सर्व स्टेकहोल्डर्स (ज्यामध्ये एम्सच्या डॉक्टरांचाही समावेश आहे) यांनी मिळून हे पत्रक जारी केले आहे. प्रत्येक टप्प्यातील चाचणी जर यशस्वी झाली तर १५ ऑगस्टपर्यंत COVAXIN ही लस बाजारात उपलब्ध होऊ शकते, असे त्यात सांगण्यात आले आहे. सध्या याबाबत केवळ शक्यता आयसीएमआरकडून वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment