चीनची मुजोरी वाढली; आता रशियाच्या एका शहरावर देखील ठोकला दावा


नवी दिल्ली : मस्तवालेल्या चीनची मुजोरी आता दिवसेंदिवस वाढतच चालली असून हाँगकाँगमधील स्वायत्तता संपवल्यानंतर चीनने आता थेट रशियाच्या व्लादिवोस्तोक शहरावरही दावा ठोकला आहे. 1860 च्या आधी व्लादिवोस्तोक चीनचा हिस्सा असल्याचे चिनी न्यूज एजन्सी CGTN चे संपादक शेन सिवईने म्हटले आहे. त्याचबरोबर 1860 च्या काळात या शहराला हैशेनवाई म्हणून ओळखले जात होते, पण हे शहर एकतर्फी करार करुन रशियाने बळकावल्याचे चीनचे म्हणणे आहे.

चीनमधील माध्यमे सरकारी इशाऱ्यावर चालतात आणि अशी जाहीर वक्तव्य कम्युनिस्ट पार्टीच्या होकाराशिवाय केली जात नाही, असा इतिहास आहे. त्याचबरोबर रशिया आणि चीनमधील संबंधही तणावग्रस्त आहेत. पाणबुडीशी संबंधित अतिमहत्त्वाच्या फाईल्स चीनच्या गुप्तचर संस्थेने चोरल्याचा आरोप रशियाने केला होता. तसेच चिनी ड्रॅगनचा जपानच्या ताब्यात असलेल्या काही द्विपसमूहांवरही डोळा आहे. जपान्यांनी अलिकडेच चिनी पाणबुडीला त्यांच्या हद्दीतून हाकलून लावले होते.

त्याचबरोबर चिनी तैवानच्या हवाई क्षेत्रात विमानांची घरघर करुन दहशत पसरवत आहेत. तसेच चीनचे फिलिपिन्स, मलेशिया, हाँगकाँग, इंडोनेशियाशीही तणावग्रस्त संबंध आहेत आणि व्लादिवोस्तोक शहर प्रशांत महासागरात या सगळ्या देशांच्या साखळीतील महत्त्वाचे शहर आहे. रशियाच्या उत्तर पूर्व भागातील हे शहर प्रिमोस्की राज्याची राजधानी आहे. हे शहर चीन आणि उत्तर कोरियाच्या सीमेजवळ आहे. दुसऱ्या विश्वयुद्धात जर्मनी आणि रशियातील सैन्यांमध्ये या ठिकाणी भीषण युद्ध झाले होते.

Leave a Comment