सहा वर्षाच्या चिमुरड्याची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याला जवानांनी धाडले यमसदनी


नवी दिल्ली – जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे गुरुवारी रात्री झालेल्या चकमकीत दहशतवादी झाहीद दास याचा खात्मा करण्यात आला असून झाहीद दास हा तोच दहशतवादी आहे, ज्याने अनंतनाग येथे सीआरपीएफ जवान आणि एका सहा वर्षाच्या चिमुरड्याची हत्या केली होती. अनंतनाग येथे जवानांनी त्याला घेरले होते. पण तेथून निसटण्यात तो यशस्वी झाला होता. पण त्यानंतर या दहशतवाद्याला चकमकीत ठार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रात्री उशिरा सीआरपीएफ आणि विशेष मोहीम पथकाकडून संयुक्तपणे सर्च मोहीम सुरु करण्यात आली होती. सीआरपीएफचा एक जवान यावेळी चकमकीत शहीद झाला. दहशतवादी झाहीद मारला गेल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

अनंतनाग येथे गेल्या आठवड्यात सीआरपीएफ पथकावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. एक सीआरपीएफ जवान या हल्ल्यात शहीद झाला होता. तर यावेळी सहा वर्षीय निहान याचाही मृत्यू झाला होता. पार्क करण्यात आलेल्या गाडीत निहान झोपला असताना त्याला गोळी लागली. हा हल्ला २६ जून रोजी करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी दुचाकीवरुन आले होते आणि गोळीबार केला.

पोलिसांनी या हल्ल्यानंतर लगेचच दहशतवादी झाहीदचा फोटो प्रसिद्ध केला होता. इस्लामिक स्टेट (ISJK) या दहशतवादी ग्रुपचा झाहीद हा सदस्य होता. सुरक्षा जवानांनी मंगळवारी झाहीद आणि इतर दोन दहशतवाद्यांना घेरले होते. पण तो त्यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाला होता. तर इतर दोन दहशतवादी ठार झाले होते.

Leave a Comment