प्रसिद्ध मालवणी नटसम्राट ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचे निधन


मुंबई – मागील दोन वर्षांपासून कर्करोगाशी लढा देत असलेले प्रसिद्ध मालवणी नटसम्राट ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचे मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. ते गोट्या, बे दुणे तीन, हसवणूक, गंगुबाई नॉन मॅट्रीक या मालिकांमधून घराघरात पोहचले होते. त्याचबरोबर हसवाफसवी, वस्त्रहरण यांसारख्या सुमारे ३० नाटकांमधून त्यांनी कामे केली होती. त्यांची ‘वात्रट मेले’ या नाटकातील भूमिका विशेष गाजली आणि अमाप लोकप्रियता मिळवली होती.

त्यांची दिलीप प्रभावळकर यांच्या हसवाफसवी या नाटकाती भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली. त्याचबरोबर मच्छिंद्र कांबळी यांच्या अजरामर वस्त्रहरण या नाटकातील त्यांची भूमिकाही गाजली. कथास्तु, हसवणूक, कॉमेडी डॉट. कॉम, चला बनू करोडपती, गंगुबाई नॉन मॅट्रीक या टीव्ही मालिकांमधूनही ते घराघरात पोहचले होते.

त्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी करत असताना आपला नाटकांमध्ये भूमिका करण्याचा छंदही जोपासला होता. केला तुका आणि झाला माका या नाटकातील अप्पा मास्तर आणि वस्त्रहरण या नाटकातील जोशी मास्तर अशा त्यांच्या भूमिकाही लोकप्रिय ठरल्या. रंगभूमी आणि मालिका विश्वात आपला वेगळा ठसा उमटवलेले लीलाधर कांबळी आज काळाच्या पडद्याआड गेले.

Loading RSS Feed

Leave a Comment