खुशखबर ; देशातील दुसरी कोरोना प्रतिबंधक लस तयार, लवकरच होणार मानवी चाचणी


नवी दिल्ली – जगभरातील बहुतांश देशांमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असून सर्वच जग या व्हायरससमोर हतबल झाले आहे. त्यातच जगातील सर्वच देश या व्हायरसचा बिमोड शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच अहोरात्र मेहनत करत प्रतिबंधक लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये भारतदेखील आघाडीवर आहे. परंतु आठवड्याभराच्या कालावधीतच आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

देशात काही दिवसांपूर्वी कोरोनावरील पहिली प्रतिबंधक लस तयार करण्यात आली होती. त्याचबरोबर याच महिन्यात त्या लसीची चाचणी करण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली होती. दरम्यान, देशात दुसरी कोरोना प्रतिबंधक लसही तयार करण्यात आली असून त्याच्या मानवी चाचणीसाठी ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने परवानगी देखील दिली आहे. ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) गेल्या पाच दिवसांमधील ही दुसरी लस आहे, जिच्या मानवी चाचणीसाठी मान्यता दिली आहे.

अहमदाबादची कंपनी झायडस कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड कोरोनाची ही दुसरी लस तयार करत आहे. या लसीच्या फेज १ आणि फेज २ च्या मानवी चाचणीसाठी ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) मान्यता दिली आहे. दरम्यान, ही मानवी चाचणी पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे म्हटले जात आहे. प्राण्यांवर या लसीची यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली आहे. त्यांना याच आधारावर पुढील फेजसाठी चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार मानवी चाचणीसाठी कंपनी लवकरच एनरॉलमेंट प्रक्रिया सुरू करणार आहे. कंपनीला पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचेही म्हटले जात आहे. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारनेदेखील उशीर न करता त्वरित याच्या पुढील चाचणीला परवानगी दिली आहे.

Leave a Comment