मोदींच्या अचानक लडाख दौऱ्यानंतर चीनची मवाळ भूमिका


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि चीनदरम्यान लडाखजवळील सीमेवर सुरु असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर लेहला सप्राइज व्हिजीट दिल्यानंतर चीनकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी मोदींच्या दौऱ्यासंदर्भात बोलताना अगदी मवाळ भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले आहे. भारत आणि चीन या भागामधील तणाव निवळण्यासंदर्भात पावले उचलत असल्याचा दाखला देत परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी हा वाद अजून चिघळण्यासारखे पाऊल कोणत्याही देशाने उचलू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

या भागामधील तणाव निवळण्यासंदर्भात भारत आणि चीन यांच्यामध्ये संवाद सुरु आहे. या भागातील तणाव कमी करण्याचे लष्करी तसेच राजकीय चर्चेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहे. अशावेळी या प्रदेशामधील तणाव वाढणारे पाऊल कोणत्याही पक्षाने उचलू नये, असे मत चीनच्या परदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment