अरे देवा…! काल दिवसभरात जवळपास २१ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच काल दिवसभरात देशात २० हजार ९०३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, कोरोनामुळे ३७९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात जवळपास २१ हजार रुग्णांची वाढ झाल्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सहा लाख २५ हजार ५४४ वर पोहचला आहे. तर सध्या दोन लाख २७ हजार ४३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर १८ हजार २१३ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे. दररोज वाढणाऱ्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार २ जुलै पर्यंत एकूण ९२ लाख ९७ हजार ७४९ नमूने तपासले आहेत. यापैकी गेल्या २४ तासांत देशात दोन लाख ४१ हजार ५७६ नमून्यांची चाचणी गुरुवारी करण्यात आली. गेल्या १२ दिवसांमध्ये देशात तब्बल २ लाख कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ६० टक्क्यांवर पोहोचल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १ कोटीच्या वर पोहोचली आहे. तर जगभरात आतापर्यंत ५ लाख जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment