आता Black Lives Matter लोगोसह मैदानात उतरणार इंग्लंडचेही खेळाडू


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील चार महिन्यांपासून बंद असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज अशी ३ कसोटी सामन्यांची मालिका येत्या ८ जुलै पासून खेळवली जाणार आहे. पण अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय इसमाची काही दिवसांपूर्वी पोलीस कोठडीत हत्या झाल्यामुळे Black Lives Matter अशी मोहिम कृष्णवर्णीय लोकांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आली.

दरम्यान वेस्ट इंडिजचे खेळाडू पहिल्या कसोटी सामन्यात Black Lives Matter चा लोगो असलेली जर्सी घालून खेळणार आहेत. विंडीजच्या अनेक खेळाडूंनी अमेरिकेतील या प्रकरणावर आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्यानंतर वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवणे आमचे कर्तव्य असल्याचे विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने सांगितले होते.

असा लोगो असलेली जर्सी घालून वेस्ट इंडिजचे खेळाडू खेळणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आता इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डानेही एक निर्णय घेतला आहे. Black Lives Matter असा लोगो असलेली जर्सी संपूर्ण कसोटी मालिकेत इंग्लंडचे खेळाडूदेखील परिधान करणार असल्याची माहिती इंडो एशियन न्यूज सर्व्हिसने दिली.

Black Lives Matter या संकल्पनेला इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. ही मोहिम सामाजिक जीवनातसकारात्मक बदल घडवण्यासाठी सुरू झाली आहे. वर्णद्वेषाला खेळात किंवा समाजात थारा नाही हे यातून दिसते आणि आम्ही त्यासाठी यास पाठिंबा देत असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्य़कारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी सांगितले.

Leave a Comment