अमेरिकेने विकत घेतला रेमडेसिविरचा सर्वच साठा; होणार औषधाचा तुटवडा


नवी दिल्ली – जगाला कोरोना घातलेला विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत असून त्यातच जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहेत. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक लस अद्यापही जगात कोणत्याही देशाकडे उपलब्ध झालेली नाही. पण अशा परिस्थिती काही निवडक औषधे कोरोनावर प्रभावी ठरत आहेत. त्यामुळेच या औषधांना जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. पण ही औषध वेळत उपलब्ध होणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.

दरम्यान त्यातील एक महत्वपूर्ण औषध असलेल्या रेमडेसिविरबद्दल एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. रेमडेसिविर औषधाचा सर्व स्टॉकच अमेरिकेने विकत घेतला आहे. रेमडेसिविर हे औषध अमेरिकेतील गिलीयड सायन्सेस ही कंपनी बनवते. अमेरिकेने रेमडेसिविरचा सर्व साठाच विकत घेतल्यामुळे या औषधाचा आता तुटवडा निर्माण होऊ शकतो. यासंदर्भातील वृत असोसिएटेड प्रेसने दिले आहे.

कोरोना व्हायरसवर लागू पडलेल्या प्रभावी औषधांपैकी रेमडेसिविर एक आहे. हा निर्णय म्हणजे अमेरिका फर्स्ट या डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेशी सुसंगत आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने सिप्ला आणि हिट्रो लॅब या दोन कंपन्यांना रेमडेसिविर औषध उपलब्ध करुन देण्याची भारतात परवानगी देण्यात आली आहे. त्यातच रेमडेसिविरचे सर्व उत्पादन पुढच्या तीन महिन्यांसाठी फक्त अमेरिकन नागरिकांसाठी करण्याचा करार ट्रम्प प्रशासनाने गिलीयड सायन्सेस बरोबर केला आहे.

रेमडेसिविर औषधाची कुठल्याही अमेरिकन नागरिकांना गरज असेल तर त्याला ते लगेच मिळाले पाहिजे, असे अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा विभागाचे सचिव अ‍ॅलेक्स अझर यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी अमेरिकेच्या रेमडेसिविरचा सर्व साठा विकत घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे.

Leave a Comment