गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी? लालबागचा राजा मंडळाकडे आशिष शेलारांची विचारणा


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना साधेपणात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक ऐतिहासिक निर्णय घेत यंदा मूर्तीची प्रतिष्ठापना करणार नसल्याचे जाहीर केले. त्यानुसार लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पत्रकार परिषद घेत गणेशोत्सवाचे ११ दिवस ‘आरोग्योत्सव’ साजरा केला जाईल अशी माहिती दिली. फक्त मुंबई आणि देशात नाही तर जगभरातील गणेशभक्तांसाठी लालबागचा राजा श्रद्धास्थान आहे. मंडळाच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतूक होत असताना भाजप नेते आशिष शेलार यांनी ८७ वर्षांची परंपरा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एकाकी खंडित करु नये असे आवाहन केले आहे.


यासंदर्भात आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपले मत मांडले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षात पारंपरिक गणेशोत्सव अडचणीत आलाय..पण बाप्पा मार्ग काढेल! मुंबईत छोट्या मंडळांसह गणेश गल्ली, चिंतामणी यांनी मुर्तीची उंची कमी करुन, सामाजिक उपक्रमांसह उत्सवाची परंपरा टिकवणार.. त्यांचे कौतुकच!,” असल्याचे आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम राबविण्याचा घेतलेला निर्णय “स्तुत्यच”. पण मंडळाची ८७ वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये. गणेशभक्तांची श्रद्धा पाहता शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा होऊ शकतो, याचा आदर्श निर्माण करण्याची “हीच ती वेळ”!”.


तसेच आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये “संकट मोठे आहे, अशावेळी सामान्य माणसाला श्रद्धाच आशादायी ठरते. संकट काळात राजाचे ऑनलाइन दर्शन सुध्दा गणेशभक्तांना दिलासा देऊ शकते! या देशात श्रध्देला मोल नाही..श्रद्धा तोलून ही पाहता येत नाही…म्हणून गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी?,” अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली आहे.

दरम्यान लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनेदेखील पत्र लिहिले असून परंपरा अखंडित ठेवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. मंडळाने जाहीर केलेला आरोग्य उत्सव उपक्रम कौतुकास्पद आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या चार फूट उंचीच्या मूर्तीबाबतच्या आवाहनानंतर केवळ लाईव्ह दर्शनाची सोय उपलब्ध करुन मंडळाने भाद्रपद उत्सवाची परंपरा अखंडित ठेवावी अशी, इच्छा समन्वय समितीने मंडळाकडे व्यक्त केली आहे. त्याचबरोबर मंडळाच्या निर्णयाला विरोध नाही मात्र परंपरा अखंडित ठेवता येईल यासाठी सुवर्णमध्य काढावा अशी विनंती देखील समन्वय समितीने यावेळी केली आहे.

Leave a Comment