२०३६ पर्यंत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी कायम राहणार व्लादिमीर पुतीन


मॉस्को – २०३६ पर्यंत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी व्लादिमीर पुतीन हे कायम राहणार असून राष्ट्राध्यक्षपदी पुतीन यांना कायम राहण्यासाठी संविधानात केलेल्या बदलांना रशियातील मतदारांनी मान्यता दिली आहे. दरम्यान, बुधवारी आठवडाभर सुरू असलेली जनमत चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे राष्ट्राध्यक्षपदावर पुढील १६ वर्षे कायम राहण्याचा पुतीन यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

तब्बल ७७ टक्के लोकांनी जनमत चाचणीदरम्यान घटना दुरुस्तीच्या बाजूने मतदान केले. त्यांची सध्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर घटना दुरुस्तीच्या माध्यमातून त्यांना प्रत्येकी सहा वर्षाच्या दोन अतिरिक्त कार्यकासाठी अध्यक्षपदाचा कार्यकाळ मिळणार आहे. रशियामधील मतदानाची प्रक्रिया कोरोना विषाणूच्या साथीमुळे होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने प्रथमच आठवडाभर चालली. जनतेला घटनेतील दुरुस्तीसाठी विश्वासात घेण्यासाठी पुतीन यांनी एक प्रचंड मोहीम हातीदेखील घेतली होती.

जाणकारांच्या मते पुतीन यांनी ही घटना दुरुस्ती संमत करण्यासाठी आणि लोकांची मने जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. ज्या देशासाठी आम्ही काम करत आहोत आणि जे पुढच्या पिढीला सोपवायचे आहे, त्यासाठी आपण मतदान करत असल्याचे पुतीन यांनी म्हटले होते. जानेवारी महिन्यात घटना दुरूस्तीचा प्रस्ताव पुतीन यांनी सादर केल्यानंतर पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी पुतीन यांच्या सांगण्यावरून राजीनामाही दिला होता. यानंतर पुतीन यांनी कमी राजकीय अनुभव असलेल्या मिखाईल मिशुस्टिन यांना पंतप्रधान केले.

Leave a Comment