केंद्र सरकारची ही योजना देणार एफडीपेक्षा जास्त व्याज


नवी दिल्ली : केंद्र सरकारने फ्लोटिंग रेट सेव्हिंग्‍स बाँड 2020 (टॅक्‍सेबल) ही गुंतवणूक योजना 1 जुलैपासून सुरु केली असून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना तब्बल 7.15 टक्के व्याज देण्यात येणार आहे. विशेष दर सहा महिन्यांनी व्याजदराचा आढावा केंद्र सरकारकडून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याचा व्याजदर बदलण्यात येणार आहे.

या महिन्यापासून सरकारची ही योजना सुरु झाली असून व्याजदरातील पुढील बदल हा 1 जानेवारी 2021 मध्ये करण्यात येणार आहे. या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यास दर महिन्याला त्याचे व्याज न मिळता दर सहा महिन्याला दिले जाणार आहे. आरबीआय बाँडच्या बदल्यात हे बाँड्स लाँच करण्यात आले आहेत. सरकारने आरबीआय बाँड मागे घेतले होते. त्याचे व्याजदर 7.75 टक्के होते. हे व्याजदर बाँडच्या पूर्ण कालावधीसाठी लागू राहणार आहेत.

कोणत्याही सरकारी बँकेतून फ्लोटिंग रेट सेव्हिंग्‍स बाँड खरेदी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर हा बाँड आयडीबीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेकडून देखील खरेदी करता येणार आहे. कोणत्याही प्रकारची या बाँडची कागदपत्रे मिळणार नसून तो पूर्णत: डिजिटल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक असणार आहे. बाँडची खरेदी केल्यानंतर ते गुंतवणूकदारांच्या बाँड लेजर खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. हे बाँड रोख रक्कम देऊनही खरेदी करता येतील. पण यावर मर्यादा असणार आहे. त्यामुळे रोख रकमेवर केवळ 20000 रुपयांचेच बाँड मिळणार आहेत. याव्यतिरिक्त ड्राफ्ट, चेक आणि इलेक्ट्रिक पेमेंट मोडच्या माध्यमातून बाँड खरेदी करता येतील.

कमीत कमी 1000 रुपये ते जास्तीत जास्त हजारच्या पटीमध्ये कितीही गुंतवणूक करता येईल. 7 वर्षांचा या बाँड्सचा अवधी असतो. वरिष्ठ नागरिकांना मुदतपूर्व बाँड परत करण्याची मुभा आहे. याच्या व्याजदरामध्ये दरवर्षी 1 जुलै आणि 1 जानेवारीला बदल केला जाणार आहे. गुंतवणूकदाराच्या खात्यामध्ये ड्यूच्या दिवशीच व्याजाची रक्कम वळती केली जाणार आहे. हा करमुक्त बाँड नसल्यामुळे कर आकारला जाणार आहे. तसेच टीडीएसही कापला जाणार आहे.

Leave a Comment