मला देखील घराणेशाहीने सोडले नव्हते – सैफ अली खान


बॉलिवूडमधील घराणेशाहीचा प्रश्न अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सध्या त्यावरून सोशल मीडियावर अनेक वाद-विवाद सुरू आहेत. या घराणेशाहीचा म्होरक्या म्हणून निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर जोरदार टीका झाली. त्यातच आता अभिनेता सैफ अली खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या घराणेशाहीचा मी सुद्धा शिकार झालो असल्याचे म्हणत सर्वांचे लक्ष वेधले आहे. सैफने या मुलाखती दरम्यान सुशांतच्या आत्महत्येबद्दलही वक्तव्य केले आहे.

सैफ अली खानने ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, कंगना कॉफी विथ करण या शोमध्ये काय बोलत होती, ते मला माहित नाही आणि करण जोहरबद्दल म्हणायचे झाल्यास, त्याने स्वत:ला एवढे मोठे बनवले आहे की आता त्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. सत्य हे नेहमी गुंतागुंतीचे असते. त्यात इतरही बऱ्याच गोष्टी असतात. पण लोकांना त्यात रस नसतो. त्याचबरोबर मी आशा करतो की ही लाट लवकरच संपेल आणि चांगल्या गोष्टी पुन्हा ऐकायला मिळतील.

भारतात असमानता आहे आणि त्याकडे लक्ष वेधणे गरजेचे असून घराणेशाही, पक्षपातीपणा, गटबाजी हे सर्व खूप वेगळे विषय आहेत. घराणेशाहीचा मी देखील शिकार झालो पण त्याबद्दल कोणी काही बोलत नाही. चित्रपट संस्थांमधून अधिकाधिक लोक पुढे येत असल्याचे पाहून मला आनंद होतो. सुशांत सिंह राजपूतबद्दल या मुलाखतीत सैफ म्हणाला, तो खूप प्रतिभावान आणि चांगला दिसणारा होता. त्याचे भविष्य खूप उज्ज्वल असल्याचे मला वाटले होते. माझ्याशी तो नम्रपणे वागला होता आणि माझ्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेचेही त्याने कौतुक केले होते. त्याला खगोलशास्त्र, तत्त्वज्ञान याविषयी फार काही बोलायचे होते. माझ्यापेक्षाही तो हुशार असल्याचे मला वाटले होते.

Leave a Comment