चीनविरोधात लढण्यासाठी भारताला 33 लढाऊ विमाने देणार रशिया


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात चीनसोबतच्या लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर फोनवर चर्चा झाली. दोन्ही देशांनी यामध्ये एका मोठ्या संरक्षण करारावर चर्चा केली. त्यानुसार रशियाकडून 33 लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा संरक्षण मंत्रालयाने केली आहे. 18 हजार 148 कोटी रुपये यासाठी लागणार असल्याचे सांगण्यात आले.

या करारानुसार रशियाकडून सुखोई-30 आणि मिग-29 ही लढाऊ विमाने भारत खरेदी करणार आहे. ही एकूण 33 लढाऊ विमाने असणार असून यामध्ये 12 सुखोई-30 आणि 21 मिग-29 विमाने आहेत. त्याचबरोबर सध्या भारतीय वायु सेनेच्या ताफ्यात असलेल्या रशियन मिग 29 च्या 59 लढाऊ विमानांना अद्ययावत करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर 248 अतिरिक्त एअर मिसाईल खरेदी करण्याचीही परवानगी संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. भारतीय हवाई दल आणि नौदलाला ही मिसाईल वापरता येणार आहे. शिवाय डीआरडीओद्वारे विकसित एक हजार किमी रेंजच्या क्रूज मिसाइलच्या प्रारुपालाही परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान फ्रान्सच्या राफेल विमानांची पहिली डिलिव्हरी याच महिन्यात दिली जाणार आहे. राफेल विमाने ही जगातील सर्वात घातक मिसाईल आणि सेमी स्टील्थ तंत्रज्ञानाने युक्त आहेत. अत्याधुनिक मीटिअर मिसाईल ही हवेतून हवेत मारा करू शकणारी या लढाऊ विमानांमध्ये मिसाईल असणार आहे. 6 राफेल विमाने फ्रान्सच्या बार्डोक्सहून येणार आहेत. यामध्ये दोन विमाने ही प्रशिक्षणासाठी असणार आहेत.

Leave a Comment