येथे चक्क हत्तींसाठी उघडली जिम, पण का ?

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मागील 3-4 महिन्यांपासून जिम बंद आहेत. अनेक लोक जिम उघडण्याची वाट पाहत आहेत. मात्र दुसरीकडे भारतातच चक्क हत्तींसाठी जिम सुरू करण्यात आली आहे. उत्तराखंडच्या राजाजी टायगर रिझर्व्हमध्ये तुम्हाला हत्ती बॉलपासून ते टायर अशा विविध वस्तूंशी खेळताना दिसेल.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, सध्या येथे 6 हत्ती आहेत. हे सर्व हत्ती आपल्या कळपापासून हरवले आहेत अथवा त्यांना उच्छाद मांडल्याने वनविभागाने पकडले आहे. यात जंगलात आपल्या आईपासून वेगळे झालेले हत्ती देखील आहेत.  वरिष्ठ पशुवैद्य डॉक्टर अदिती शर्मा या हत्तींची आरोग्य तपासणी व त्यांच्यावर उपचार करतात.

शर्मा यांच्यानुसार, कॅम्पमध्ये हत्तींना खाण्या-पिण्याच्या सर्व सुविधा दिल्या जातात. मात्र जंगलाप्रमाणे येथील स्थिती नाही. म्हणूनच जंगलाप्रमाणे त्यांना आनंद देण्यासाठी जिम सुरू केली आहे. जिम्नेजियममध्ये हत्तींना जबरदस्ती केली जात नाही, त्यांना केवळ नैसर्गिक वातावरण देण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे हत्तींना मानसिक तणाव होणार नाही व ते निरोगी राहतील.

या हत्तींमध्ये एक उच्छाद मांडणारा हत्ती देखील आहे. राजा नावाच्या या हत्तीने 2017-18 मध्ये हरिद्वार भागात दोन जणांचा जीव घेतला होता. तेव्हा राजाजी टायगर रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांनी या हत्तीला पकडले व नंतर तो जंगलात पळून गेला. मात्र पुन्हा त्याने उच्छाद मांडण्यास सुरुवात केल्यानंतर त्या हत्तीला पुन्हा पकडण्यात आले व जंगला सोडण्या ऐवजी त्याला पाळण्यात आले.  शर्मा यांच्यानुसार, आता हा हत्ती शांत झाला आहे. कॅम्पमधीलच रंगिली नावाच्या हत्तीणीसोबत त्याची चांगली मैत्री आहे. दोघे सोबतच असतात.

Leave a Comment