धक्कादायक! कोरोनामुळे झाला वृद्धाचा मृत्यू, 48 तास फ्रीजरमध्ये ठेवले शव

पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्तामध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या वृद्धाचे शव दफन करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून कोणतीही मदत न मिळाल्याने कुटुंबाला त्यांचे शव जवळपास 48 तास फ्रीजमध्ये ठेवावे लागल्याची माहिती समोर आली आहे. एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 71 वर्षीय व्यक्तीचा मध्य कोलकत्ता येथील राजा राममोहनराय सरानी भागातील आपल्या घरी सोमवारी मृत्यू झाला. सोमवारी त्रास होत असल्याने त्यांना डॉक्टराने कोरोनाची चाचणी करण्यास सांगितली होती व त्यांनी चाचणी केली देखील होती.

कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, मात्र घरी येताच त्यांची प्रकृती बिघडली व दुपारी त्यांचा मृत्यू झाला. सुचना मिळाल्यावर संबंधित डॉक्टर व्यक्तीच्या घरी देखील गेला. मात्र कोव्हिड-19 चे प्रकरण असल्याने त्याने मृत्यू प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्याने कुटुंबाला अहमर्स्ट स्ट्रीट स्टेशनशी संपर्क साधण्यास सांगितले.

पोलिसांनी कुटुंबाला स्थानिक नगरसेवकाशी संपर्क साधण्यास सांगितले. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, तेथे देखील काहीच मदत मिळाली नाही व आम्हाला राज्य आरोग्य विभागाशी संपर्क साधण्यास सांगितले. हेल्पलाईन नंबरवर आरोग्य विभागाला देखील फोन केला, मात्र त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. कुटुंबाने शवगृहाशी देखील संपर्क केला, मात्र तेथेही काही मदत मिळाली नाही. यानंतर कुटुंबाने अंत्यसंस्कारापर्यंत शव ठेवण्यासाठी फ्रीजरची सोय केली.

मंगळवारी वृद्धाचा रिपोर्ट आल्यानंतर त्यात कोरोनाची लागण झाली होती, असे स्पष्ट झाले. यानंतर बुधवारी आरोग्य विभागाचा फोन आल्यानंतर सर्व माहिती सांगितली. अखेर कोलकत्ता महापालिकाचे अधिकारी आले व ते अंत्य संस्कारासाठी शव घेऊन गेले.

Leave a Comment