चिनी सरकारविरोधात त्यांचेच सैनिक कोणत्याही क्षणी करू शकतात सशस्त्र आंदोलन


नवी दिल्ली – चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट सरकारला पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात भारतीय लष्करासोबत झालेली चकमक चांगलीच महागात पडत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान भारतीय जवानांनी चीनच्या ४० जवानांना या चकमकीत ठार केले होते. पीपल्स लिबरेशन आर्मीचे माजी अधिकारी आणि विद्यमान सैनिकांमध्ये ही माहिती लपवल्यामुळे नाराजी वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच कोणत्याही क्षणी सरकारविरोधात ते सशस्त्र आंदोलन करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत. हा गौप्यस्फोट कम्युनिस्ट पक्षाच्या माजी नेत्याचे पुत्र आणि चीनच्या सिटीझन पॉवर इनिशिएटिव्हचे अध्यक्ष जियानली यांग यांनी वॉशिंग्टन पोस्टच्या ओपिनिअनमध्ये केला आहे.

पीएलए चीनच्या सत्तेतील गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य भाग राहिला आहे. देशसेवेत काम करणाऱ्या पीएलए केडरच्या जर भावना दुखावल्या गेल्या तर ते सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांमध्ये सामील होतील आणि देशाच्या सरकारविरूद्ध बंडखोरी करतील, असे यांग यांनी म्हटले आहे. आपले अधिक सैनिक ठार झाले हे जर सरकारने मान्य केले तर देशांत अशांतता पसरेल आणि सीपीपीच्या सत्तेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असे वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात यांग यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत सीसीपी सरकारसाठी मजबूत आधारस्तंभ म्हणून पीएलएने काम केले आहे. पीएलएच्या विद्यमान सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि ते जर एकत्र आले तर (यामध्ये त्या सदस्यांचा समावेश आहे जे शी जिनपिंग यांच्यावर नाराज आहेत) शी यांच्या नेतृत्वाला मोठे आव्हान देऊ शकतात, असेही आपल्या लेखात त्यांनी म्हटले आहे.

चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांना या चकमकीत किती सैनिक मारले गेल्याचे विचारण्यात आले. त्यावेळी आपल्याकडे माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर भारतीय माध्यमांचा त्यांनी हवाला दिला. यात चीनचे ४० सैनिक ठार झाल्याचे सांगण्यात आले होते. पण त्यांनी ती चुकीची माहिती असल्याचे दुसऱ्या दिवशी सांगितल्याचेही ते म्हणाले.

चीनने एका आठवड्यानंतरही आपले किती सैनिक ठार झाले हे सांगितले नाही. परंतु दुसरीकडे शहीद झालेल्या जवानांची भारताने सार्वजनिकरित्या माहिती दिली आणि त्यांना शहीदांचा सन्मानही देण्यात आला. पीएलएच्या अनेक माजी सैनिकांना चीन सरकारच्या या वागण्याच्या राग आला आहे आणि त्यांचा राग दिवसेंदिवस वाढतच असल्याचेही यांग यांनी लिहिले आहे.

Leave a Comment