‘जे बेरोजगार होतील त्यांचे काय ?’, अ‍ॅप्स बंदीवर नुसरत जहां यांचा सरकारला सवाल

भारत-चीनच्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने डेटा सुरक्षाचे कारण देत चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. या बंदी घातलेल्या अ‍ॅपमध्ये भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टीक-टॉकचा देखील समावेश आहे. आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांनी टीक-टॉक बंदीच्या सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

नुसरत जहां यांनी कोलकत्ता येथील इसकॉनद्वारे आयोजित उल्टा रथ यात्रेत भाग घेतला होता. यावेळी त्यांनी टीक-टॉक बॅनवर प्रतिक्रिया दिली. जहां म्हणाल्या की, टीक-टॉक एक मनोरंजन अ‍ॅप आहे. हा एक आवेगपूर्ण निर्णय आहे. धोरणात्मक नियोजन काय आहे ? जे बेरोजगार होतील त्यांचे काय ? लोकांना नोटबंदी प्रमाणे हे देखील सहन करावे लागेल. मला बंदीबाबत काहीही समस्या नाही, कारण ते राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. मात्र इतर प्रश्नांची उत्तरे कोण देणार ?

नुसरत जहां या स्वतः सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. टीकटॉकवर देखील त्यांचे लाखो फॉलोअर्स होते. सरकारने चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता सर्वच स्तरातून समिश्र प्रक्रिया येत आहेत.

Leave a Comment