देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ लाख ८५ हजार ४९३ वर


नवी दिल्ली – जगासह आपल्या देशावर ओढावलेल्या कोरोनाचे संकट अद्यापही वाढताना दिसत आहे. त्यातच देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात मागील २४ तासांत तब्बल १८ हजार ६५३ नवे रुग्णांची भर पडली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे ५०७ जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ लाख ८५ हजार ४९३ वर पोहचला आहे.

एकूण कोरोनाबाधितांमधील २ लाख २० हजार ११४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून ३ लाख ४७ हजार ९७९ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात १७ हजार ४०० जणांना जीव गमावावा लागल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे.

देशभरातील कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असले तरी या रोगावर मात करणाऱ्यांची संख्या देखील वाढू लागली आहे. लॉकडाऊन सुरू होण्याआधी ३ टक्क्यांवर असणारे प्रमाण आता ६० टक्क्यांवर पोहोचले आहे. दिल्लीत हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त म्हणजे ६६ टक्के आहे. बरे झालेले रुग्ण व उपचाराधीन रुग्ण यांच्यातील फरकही विस्तारत असून तो आता १ लाख २० हजार आहे.

देशातील ८५.५ टक्के कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यांमध्ये आहेत. त्यातही महाराष्ट्रानंतर आता पुन्हा तमिळूनाडमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवडय़ात दिल्ली दुसऱ्या स्थानावर होती. तमिळनाडूमध्ये रुग्णसंख्या ८६ हजार २२४ झाली असून दिल्लीमध्ये एकूण रुग्णसंख्या ८५ हजार १६१ झाली आहे.

Leave a Comment