आजारी वडिलांना घेऊन सायकलवरुन 1200 किमीचा प्रवास करणाऱ्या ज्योतीवर बनणार चित्रपट


ज्यांना फाळणीच्या वेळेच स्थलांतर पाहायला भेटले नसेल त्यांना ते स्थलांतर कोरोनाच्या संकट काळात पाहायला भेटले. देशात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या लाखो मजुरांनी आपल्या गावाचा रस्ता धरला. कुणी चालत, कुणी सायकलवर तर कुणी मिळेल त्या वाहनाने आपआपल्या गावी पोहचू लागला. पण स्थलांतरादरम्यान ज्योतिकुमारी पासवान हिने केलेल्या कौतुकास्पद कार्याची चांगलीच चर्चा झाली. ज्योतिने आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून 1200 किलोमीटरचा प्रवास पार केला. तिला गुरुग्राम ते दरभंगा या प्रवासात अनंत अडचणींचा सामना करावा लागला. पण आता याच ज्योतिकुमारीच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्यात येणार आहे.

ज्योतिकुमारीचा प्रवास पडद्यावर मांडण्याचा निर्णय वुईमेक फिल्म्स या बॅनरने घेतला आहे. या चित्रपटाचे काम ऑगस्टमध्ये सुरु होईल. चित्रपटात ज्योतिकुमारी स्वत:च तिचे पात्र साकारणार असून विशेष म्हणजे या चित्रपटाचे नाव आत्मनिर्भर असे असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ज्योतीने भोगलेले दु:ख, तिचा प्रवास आणि काही कल्पनात्मक प्रसंगही दाखवण्यात येणार असल्याचे दिग्दर्शक कृष्णा यांनी सांगितले. ज्योतिच्या दिल्ली ते दरभंगा या प्रवासाच्या मार्गावर विविध ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.

लॉकडाऊन काळात गुरुग्रामवरुन वडिलांना सायकलवर बसवून 1200 किलोमीटर प्रवास करत पोहोचलेल्या ज्योतीचे खूप कौतुक झाले होते. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी देखील ट्विट करत ज्योतीचे कौतुक केले होते. 15 वर्षीय ज्योती कुमारीने आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसून सात दिवसांत तब्बल गुरुग्रामवरुन दरभंगा असा 1200 किमी अंतर प्रवास केला होता.

Leave a Comment