कोणत्याही कायदेशीर बंधनाशिवाय देशभरात उपलब्ध होईल पतंजलीचे कोरोनिल किट


हरिद्वार (उत्तराखंड) -योगगुरु बाबा रामदेव यांनी हरिद्वार येथे पत्रकार परिषदेत पतंजलीच्या आयुर्वेदिक ‘स्वासरी कोरोनील किट’वर कोणतेही निर्बंध नसून देशभरात हे किट उपलब्ध होईल, त्याचबरोबर हे कीट कोरोनावरील व्यवस्थापनासाठी असल्याचा दावा केला आहे.या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

पतंजलीने मागील आठवड्यात कोरोनावर आयुर्वेदीक औषध शोधल्याचा दावा केल्यानंतर या औषधांची जाहिरातही पतंजलीने सुरु केली होती. पण या औषधाच्या जाहिरातीवर आयुष मंत्रालायने बंदी आणत औषधाचे सर्व अहवाल तपासासाठी घतले होते. पतंजलीचा दावा आयुष मंत्रालय तपासून पाहत आहे. कोरोनाच्या औषधाची चाचणी आयुष मंत्रालयातील टास्क फोर्सकडून करण्यात आल्यानंतर रामदेवबाबांनी आज पत्रकार परिषद घेतली.

पत्रकार परिषदेत रामदेव बाबा म्हणाले, पतंजलीने कोरोना संसर्गाच्या व्यवस्थापनासाठी योग्य काम केले असल्याचे आम्हाला आयुष मंत्रालयाने म्हटले. योग्य दिशेने पतंजलीचे काम सुरु आहे. या औषधांसाठी आम्ही राज्य सरकारकडून परवानगी घेतली आहे, त्याचबरोबर आयुष मंत्रालयाशी राज्य सरकारे जोडले गेले आहे. पण परवानगीमध्ये ट्रिटमेंट (उपचार) हा शब्द वापरण्यात आला नाही.


आमचे कोणतेही मदभेद आयुष मंत्रालयाशी नाहीत. आता कोरोनिल, श्वासरी, गिलोय, तुलसी, अश्वगंधा या औषधांवर कोणतेही निर्बंध नाहीत. श्वासरी कोरोनिल किट आजपासून कोणत्याही कायदेशीर बंधनाशिवाय देशभरात उपलब्ध होईल. आयुष मंत्रालय आणि मोदी सरकारचे धन्यवाद, असे रामदेव बाबा म्हणाले.

या औषधासाठी पतंजलीने अनेक चाचण्या केल्या आहेत. 3 दिवसात 69 टक्के तर 7 दिवसांत 100 टक्के कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. याचे सर्व अहवाल आयुष मंत्रालयाकडे पाठविण्यात आले आहेत. तर मंत्रालयाकडे चार क्लिनिकल चाचण्यांचा अहवाल पाठविण्यात आला आहे. आम्ही केलेले संशोधन सर्व नियमांनुसार असल्याचे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे.

Leave a Comment