भारतासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य; नेपाळच्या पंतप्रधानांचा सत्ताधारी पक्षाने मागितला राजीनामा

नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना नकाशा प्रकरणा वादग्रस्त वक्तव्य करणे महागात पडले असून, आता सत्ताधारी पक्षानेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ओली हे काही दिवसांपुर्वी म्हणाले होते की, नेपाळने नवीन राजकीय नकाशा मंजूर केल्यानंतर त्यांना पदावरून हटविण्याचा प्रयत्न केला जात आहे  व यात भारताचा देखील सहभाग आहे.

बालूवाटर येथे पंतप्रधानांच्या निवासस्थानी सत्ताधारी नेपाळ कम्यूनिस्ट पक्षाची स्थायी समितीची बैठक सुरू होताच माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी ओली यांच्या वक्तव्यावर टीका केली. ते म्हणाले की, भारत त्यांना पदावरून हटवण्याचे षडयंत्र रचत आहे. हे पंतप्रधानांचे वक्तव्य राजकीयदृष्ट्या योग्य नाही व मुत्सद्दीपणाने देखील योग्य नाही. पंतप्रधानांनी अशा प्रकारे वक्तव्य केल्याने शेजारी देशांसोबतचे संबंध खराब होऊ शकतात.

ओली म्हणाले होते की, त्यांना पदावरून हटविण्यासाठी दूतावास आणि हॉटेल्समध्ये अनेक हालचाली सुरू आहेत. नेपाळचे काही नेते देखील यात सहभागी आहेत. या वक्तव्यानंतर प्रचंड यांच्यासोबतच पक्षातील वरिष्ठ नेते माधव कुमार नेपाल, झालानाथ खनल, उपाध्यक्ष बमदेव गौतम आणि प्रवक्ता नारायणकाजी श्रेष्ठ यांनी पंतप्रधानांनी हे आरोप सिद्ध करावे अथवा राजीनामा द्यावा असे म्हटले आहे. पंतप्रधानांनी नैतिक आधारावर राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले. या आधी एप्रिल महिन्यात देखील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

Leave a Comment